धुळे- गौणखनिज तपासणी करणार्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी महिला तलाठी निशा पावरा यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक गौरव चौधरी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी. तसेच भाजपाने त्यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जोरदार आंदोलन करण्यात आले.
महिला तलाठ्याला मारहाण प्रकरण : नगरसेवकावर कठोर कारवाईसाठी राष्ट्रवादी महिला आघाडीचे आंदोलन 'भाजपाने चौधरी यांचा राजीनामा घ्यावा'
याबाबत राष्ट्रवादी महिला आघाडीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दिनांक 5 जून 2021 रोजी, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी महिला तलाठी निशा पावरा व त्यांच्या पथकातील इतर महिला कर्मचारी हे गौणखनिज तपासणी करीत होते. यावेळी त्यांनी वाळू वाहतूक करणारे डंपर चालकास रॉयल्टी बाबत विचारणा केली असता, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यामुळे कारवाईच्या भीतीने चालक मालमोटार सोडून पसार झाला. यानंतर अकरा वाजेच्या सुमारास भाजपाचे नगरसेवक गौरव चौधरी हे घटनास्थळी दाखल झाले. सदर ठिकाणी नगरसेवक गौरव चौधरी व गौणखनिज तपासणी कर्मचारी यांच्यात वाद झाला. त्याचवेळी नगरसेवकाने महिला तलाठी निशा पावरा यांना जातिवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. हा प्रकार अतिशय निंदनीय असून या प्रकरणी भाजपा नगरसेवक गौरव चौधरी यांच्यावर विनयभंग, अॅट्रॉसिटी व शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना कडक शिक्षा व्हावी व महिला तलाठी निशा पावरा यांना न्याय मिळवून द्यावा, तसेच भाजपाने चौधरी यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे.
या आंदोलनात जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, सरोज पवार, माधूरी पाटील, तरुणा पाटील, गणेश धुळेकर, राज देवरेआदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा- जनतेच्या लसीकरणाची पूर्ण जबाबदारी आता केंद्राची, 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस मिळणार - पंतप्रधान