धुळे- जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सामोडे येथील माधव स्मृती आदिवासी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक प्रमोद विठ्ठल जगताप यांना १० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या कारणावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.
सामोडे (ता.साक्री, जि. धुळे) येथील माधव स्मृती आदिवासी प्राथमिक शाळेतील महिला कर्मचाऱ्याचे जुलै २०१९ चे वेतन थकीत होते. थकीत वेतन मिळावे यासाठी संबंधित महिला कर्मचाऱ्याने मुख्याध्यापक जगताप यांच्याकडे वारंवार विनंती केली होती. हे वेतन काढून देण्यासाठी मुख्याध्यापक प्रमोद जगताप यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्याकडून १० हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने त्या महिलेच्या पतीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करून मुख्याध्यापक प्रमोद जगताप याला अटक करण्यात आली आहे.