धुळे- शहरातील साक्री रोड भागात शुक्रवारी झालेल्या अपघातात गुंजन पाटील या विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे 'गुंजन'चा अपघात; स्थानिकांचा आरोप - जागीच मृत्यू
साक्री रोड भागात झालेल्या अपघातात गुंजन पाटील या विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्घेटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
धुळे शहरातील साक्री रोड भागातील सिंचन भवन समोर भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने गुंजन पाटील नावाच्या विद्यार्थिनीला चिरडले. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासनाने याठिकाणी असलेल्या झाडाची कत्तल केली आणि हा अपघात झाडांमुळे झाला असल्याचा अजब दावा केला.
याठिकाणी दुभाजक नसून याबाबत वारंवार प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करून देखील याठिकाणी दुभाजक टाकण्यात आलेले नाहीत. तसेच रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यत अवजड वाहनांना शहरात प्रवेश दिला जाऊ नये हे बंधनकारक असताना देखील शहरात अवजड वाहने येत असतात. या घटनेस जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता धर्मेंद्र झालटे आणि एजाज शहा यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.