धुळे- शहराजवळच्या वार या गावात नातवाने आजोबाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून येखील कालिका मंदिरात ही हत्या करण्यात आली आहे. आत्माराम हिरामण पारधी (वय - 68) असे मृताचे नाव आहे. समाजातून वाळीत टाकल्याच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ज्ञानेश्वर पारधी असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
जुना वाद उकरून नातवाकडून आजोबाची हत्या समाजाने टाकले होते वाळीत-
घटनेतील आरोपी ज्ञानेश्वर पारधी हा आत्माराम पारधी यांचा चुलत नातू आहे. ज्ञानेश्वरला समाजाने वाळीत टाकले आहे. तसेच गावातील कालिका मातेच्या पुजेसाठी किंवा कार्यक्रमात त्याला सहभाग घेऊ दिला जात नव्हता. याचबरोबर आजोबा आणि नातवाचे जुने वाद होते. ते वाद उकरून काढत ज्ञानेश्वरने शुक्रवारी आजोबा हिरामन यांची हत्या केली.
आरोपी फरार-
हत्येची ही घटना पारधी वाड्यातील कालिका माता मंदिरात घडली. त्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर घटनास्थळावरून फऱार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डी. वाय. एस. पी दिनकर पिंगळे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी भेट दिली. या प्रकरणी पंचनामा करून पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारावर आरोपीवर पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात 302 चा गुन्हा दाखल केला आहे.