धुळे :शिरपूर पोलिसांनी गुरूवारी २० जुलै रोजी ही कारवाई केली. बडवानी (मध्यप्रदेश) येथून दाढी वाढवलेले दोन व्यक्तीला गावठी बनावटीचे पिस्तूल घेवून शिरपूरकडे जात आहेत, अशी खात्रीशीर माहिती सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना मिळाली. त्यानुसार जयेश खलाणे यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनिल वसावे, महिला पोलीस उपनिरीक्षक मंगला पवार, पोलीस नाईक संदीप ठाकरे, कॉन्स्टेबल संजय भोई, योगेश मोरे, संतोष पाटील, इसरार फारुकी यांना तात्काळ रवाना केले.
मुंबई-आग्रा महामार्गवर शिताफीने पकडले : बातमीप्रमाणे हाडाखेड शिवारात सीमा तपासणी नाका जवळ मुंबई-आग्रा महामार्गावरील ब्लॅक हार्ट रेस्टॉरंटच्या समोर रोडवर, रात्री १० वाजेच्या सुमारास हे पायी येताना दिसले. सदर व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी हटकले असता त्यांना पोलीस आल्याचे समजल्यावर ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून शिताफीने पकडले. विचारपूस करता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी सदर व्यक्तींना विश्वासात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले. त्यांनी त्यांचे नाव निलेश हनुमंत गायकवाड (वय ३० रा. वडगाव हवेली ता. कराड जि. सातारा) मनीष संजय सावंत (वय २२ रा. सोमवार पेठ कराड ता. कराड जि. सातारा) असे सांगितले. त्यांची अंगझडती व त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात गावठी पिस्तूल आढळले.
जप्त केलेला मुद्देमाल असा: १ लाख ८० हजार रुपये किमतीचे ४ गावठी बनावटीचे पिस्तूल मॅक्झिनसह, १० हजार रुपये किमतीचे २ अतिरिक्त मॅगझिन, ७ हजार रुपये किमतीची ७ जिवंत काडतूसे असे एकूण १ लाख ९७ हजार किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. याप्रकरणी काॅन्स्टेबल इसरार फारूकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे, गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.