धुळे - तालुक्यातील कुसुंबा गावातील विद्यूत पुरवठा दोन महिन्यापासून खंडीत असल्याने गाव अंधारात आहे. त्यामुळे विद्युत थकीत वीज बिलाची भरणा पंधराव्या वित्त आयोगातून करुन गावातील अंधार दुर करावा, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्राम पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. अनेक दिवसांपासून ते या मागणीसाठी पाठपुरावा करत आहे.
दिवाबत्तीच्या विद्युत देयकासाठी माजी जिल्हा परिषद सदस्याचे उपोषण - kusumba grampanchayat
कुसुंबा ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीकडे ग्रामीण दिवाबत्तीचे वीज बिल थकीत आहे. थकीत वीज बिलाची भरणा ग्रामपंचायती कडून करण्यात आली नसल्याने वीज वितरण कंपनीने गावातील सर्वच खांबावरील वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून कुसुंबा गाव अंधारात आहे.
कुसुंबा ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीकडे ग्रामीण दिवाबत्तीचे वीज बिल थकीत आहे. थकीत वीज बिलाची भरणा ग्रामपंचायती कडून करण्यात आली नसल्याने वीज वितरण कंपनीने गावातील सर्वच खांबावरील वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून कुसुंबा गाव अंधारात आहे. कोरोना संकट कालावधीत गावातील वीज पुरवठाच बंद असल्यामुळे नागरीकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. दिवाबत्तीच्या वीज बिलाची भरणा पंधराव्या वित्त आयोगाच्या रकमेतून करण्यात यावा, जेणेकरुन गावातील वीज पुरवठा पूर्ववत सुरु होईल, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्राम पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती.
त्याचप्रमाणे यासंदर्भात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांच्याकडे देखील पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीच हालचाल करण्यात येत नसल्यामुळे अखेर गुरुवारी संग्राम पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या गांधी पुतळ्याजवळ उपोषण सुरु केले. उपोषण सुरु झाल्यानंतर गटविकास अधिकारी गौतम सोनवणे यांनी तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्षा कुसुमताई निकम, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस कामराज निकम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन देखील दिले.