धुळे - जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खलाने येथील माजी सरपंच विजय टाटीया यांना महिलांनी बेदम मारहाण केल्याची घटन समोर आली आहे. मालमत्तेच्या वादातून ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - टिकटॉकवरून आदिवासी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; आदिवासी संघटनेचे निषेध आंदोलन
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खलाणे या गावाचे माजी सरपंच विजय टाटीया हे न्यायालय कामानिमित्त शिंदखेडा गावात आले होते. यावेळी बाभूळदे येथील विलास निंबाजी शिंदे, प्रतिभा विलास शिंदे, मीराबाई पाटील, भूषण विलास शिंदे, अनिता साळवे आणि विजय टाटिया यांच्यात मालमत्तेच्या वादातून भांडण झाले. हे भांडण वाढत जाऊन याचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी गावातील शिवाजी चौकातून बसस्थानकापर्यंत महिलांनी विजय टाटिया यांना बेदम मारहाण करत आणले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली, या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेतली. मात्र, यावेळी बघ्यांचीच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
याप्रकरणी विजय टाटीया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदखेडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याउलट विलास शिंदे गटाकडून विजय टाटीया यांच्याविरुद्ध विनयभंगप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा - मलकापूर नगरपरिषद उपाध्यक्षाच्या पुत्राचा बँकेत राडा; घटना CCTV मध्ये कैद