धुळे - साक्री तालुक्यातील काशीदार गावात एका विहिरीत बिबट्या पडला होता. त्याला बाहेर काढण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
धुळ्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश - कर्मचारी
जिल्ह्यातील विविध भागात बिबट्यांच्या वावर वाढला आहे. या बिबट्यांचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
साक्रीपासून काही किलोमीटर अंतरावर काशिदार गाव आहे. पाण्याच्या शोधात असलेला हा बिबट्या या गावाजवळील एका शेतातील खोल विहिरीत पडला. यानंतर वनविभागास याबाबत कळवले असता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर क्रेनच्या साहाय्याने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागास यश आले.
ही बातमी गावात पसरल्यावर बिबट्यास पाहण्यासाठी विहिरीच्या आजूबाजूला बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. जिल्ह्यातील विविध भागात बिबट्यांच्या वावर वाढला आहे. या बिबट्यांचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.