धुळे- जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या अक्कलपाडा धरणातील पाण्याचा पांझरा नदी पात्रात विसर्ग करण्यात आल्याने या पुराचा फटका साक्री आणि पिंपळनेर गावाला बसला आहे. गावातील अनेक भागात पाणी शिरले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठी न जाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
साक्री शहरातून वाहणाऱ्या कान नदीच्या पुराचे पाणी तिरंगा नगर आणि नवकार नगरमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिंपळनेर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. शाळा महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली असून पुलावरून दोन्ही बाजूंनी अडकलेल्या नागरिकांना समुहा समुहाने मार्गस्थ करण्यात आले आहे. नदीच्या दोन्ही बाजुने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. पिंपळनेरकडे जाणारी वाहने अखेर बंद करण्यात आले आहेत.