धुळे- आनंद खेडा येथील शेतकऱ्याचा उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्या दालनात हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. निम्न पांजरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी 8 वर्षांपूर्वी या शेतकऱ्याची जमीन भूसंपादित करण्यात आली होती. या भूसंपादित जमिनीचा मोबदला मिळावा, शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे घालत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा मृत्यू हेही वाचा - धुळ्यात पुलावरून वाहन खाली कोसळले; 5 लहान मुलांसह 7 जणांचा मृत्यू
सजन रूपचंद कोळी (वय 63) असे या मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने कोळी यांना जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमधून प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त होत आहे.
निम्न पांझरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी धुळे तालुक्यातील सुटरेपाडासह विविध गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादन केलेल्या आहेत. गेल्या 8 वर्षांपूर्वी भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, म्हणून सर्व बाधित शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे घालत आहेत. या सर्व बाधित शेतकऱ्यांना उपजिल्हाधिकारी भुसंपादन यांनी नोटीस बजावत दावा हरकत असल्यास त्या कचेरीत मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी इतर शेतकऱ्यांसोबत उपस्थित असलेले सजन कोळी यांना हृदयविकाराचा झटका आला.
हेही वाचा - धुळे महापालिकेत विकासकामांवरून नगरसेवकांनी घातला गोंधळ
या घटनेमुळे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पाटबंधारे आणि भूसंपादन विभाग व जिल्हाधिकारी यांच्या विषयी रोष प्रकट करण्यात येत आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हा रुग्णालयात आनंदखेडा परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.