महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पीडितेने गर्भापात करण्यास नकार दिल्याने जात पंचायतीकडून कुटुंबावर बहिष्कार - posco

जातपंचायतीचा आदेश धुडकावल्यामुळे एका कुटुंबावर बहिष्कार घालण्यात आला आहे.

पीडित मुलीचे वडील

By

Published : Jun 4, 2019, 5:08 PM IST

Updated : Jun 4, 2019, 5:20 PM IST

धुळे- जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील धोंगडीपाडा हे गाव सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. जातपंचायतीचा आदेश धुडकावल्यामुळे एका कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले आहे. या गावातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. कालांतराने ही पीडित मुलगी गरोदर राहिली. मात्र, जात पंचायतीकडे न्याय मागण्यासाठी गेले असता गर्भपात करण्याचा आणि ११ हजार रुपये दंड भरण्याचा अजब निर्णय जातपंचायतीने दिला.

पीडित मुलीचे वडील

ही पीडित मुलगी धुळे जिल्हा रुग्णालयात प्रसूत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. साक्री तालुक्यातील धोंगडीपाडा गावातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे आईवडील मोलमजुरी करण्यासाठी गुजरात येथे गेले होते. ते एप्रिल महिन्यात घरी परतल्यावर आपली मुलगी ८ महिन्यांची गरोदर असल्याचे त्यांना समजले. याबाबत मुलीला विचारल्यावर तिने घडलेला सगळा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला.

गावातील जातपंचायत सदस्याच्या नातेवाईकाने या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. या घडलेल्या प्रकाराबाबत न्याय मागण्यासाठी पीडित मुलीचे आई-वडील जात पंचायतीसमोर गेले असता पंचायतीने गोळ्या देऊन गर्भपात करण्याचे फर्मान सोडले. हा आदेश पीडित मुलीच्या आई-वडिलांनी धुडकावून लावत याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सुरुवातीला पोलिसांनी देखील टाळाटाळ केली. उलट "गावातील प्रकरण गावातच मिटवा" असा अजब सल्ला त्यांनी दिला. यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर जात पंचायतीने तक्रार परत घ्या किंवा ११ हजार रुपये दंड भरा, असा आदेश या कुटुंबाला दिला.

ही अल्पवयीन मुलगी सध्या धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून तिने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. पीडित मुलीने गर्भापात केला नाही म्हणून जात पंचायतीने या कुटुंबाला वाळीत टाकले आहे. गेल्या २ महिन्यांपासून या कुटुंबावर दबाव टाकण्यात येत असून गावात पाणी भरू दिले जात नाही. तसेच गिरणीवर दळण दळू दिले जात नाही. आम्हाला सारख्या धमक्या दिल्या जात असून आम्ही प्रचंड दहशतीखाली आहोत आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी या पीडित मुलीच्या आई वडिलांनी केली आहे.

Last Updated : Jun 4, 2019, 5:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details