धुळे - शहरातील साक्रीरोड परिसरातील फुले नगरात एका घरात सुरू असलेला बनावट दारूचा अड्डा शहर पोलिसांनी उद्ध्वस्त केला. यावेळी पोलिसांना विरोधही झाला. मात्र या विरोधाला न जुमानता पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून या अड्ड्याचा म्होरक्या मात्र फरार झाला आहे.
धुळ्यात बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त - Fake foreign liquor factory
मोगलाईतील फुले नगर भागात एका घरात देशी-विदेशी बनावट दारू तयार करून ती सिलबंद करीत विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक नितीन देशमुख यांनी काल (गुरुवार) दुपारी पावणे तीनच्या सुमारास छापा टाकला.
मोगलाईतील फुले नगर भागात एका घरात देशी-विदेशी बनावट दारू तयार करून ती सिलबंद करीत विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक नितीन देशमुख यांनी काल (गुरुवार) दुपारी पावणे तीनच्या सुमारास छापा टाकला. यावेळी महिलांना पुढे करून पोलिसांना विरोध करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी तो विरोध मोडून काढीत हा बनावट दारूचा अड्डा उध्वस्त केला.
या ठिकाणाहून दीड लाख रुपये किंमतीची महिंद्रा पिकअप गाडी ताब्यात घेण्यात आली. विशेष म्हणजे या गाडीच्या दर्शनी भागावर एम.एच. १२ / जेएफ १८११ व मागील बाजूस एम. एच.०४/एचडी १९२३ असे दोन वेगवेगळे क्रमांक असलेली नंबरप्लेट आढळून आली. शिवाय वाहतुकीचा परवाना असल्याचे द्योतक समजल्या जाणाऱ्या पिवळ्या रंगाच्या प्लेटवर हे नंबर टाकण्यात आले होते. पोलिसांनी विशाल संजय केदार याच्या घराची झडती घेतली. त्यात गाडीतील ४ लाख ९ हजार रूपये किंमतीचे विदेशी दारू बाटल्यांचा बॉक्स, १९ हजार ३२० रूपये किंमतीचे घरात ठेवलेले विदेशी दारूचे चार बॉक्स, १५ हजार ८१० रूपये किंमतीचे तीन उघड्या बॉक्समध्ये रॉयल टॅग व्हीस्की, ८४० रूपये किंमतीची प्लास्टीक ट्रेमध्ये ठेवलेली इंम्पीरीयल ब्ल्यू व्हीस्की, ४५० रुपये किंमतीची मॅकडॉल व्हीस्की, १२ हजार रूपये किंमतीचे बाटल्यांचे बुच लावून सील करणारे दोन लोखंडी हॅण्ड मेकर मशिन, २०० रूपये किंमतीचे विदेशी दारू बनविण्यासाठी लागणारे रसायन, २०० रूपये किंमतीचा ४० लिटरचा ड्रम, ६० हजार रूपये किंमतीचे स्पिरीट, १५ हजार रूपये किंमतीचे रसायन, २ हजार रूपये किंमतीच्या रिकाम्या बाटल्या, ४०० रूपये किंमतीचे बुच, २९० रूपये किंमतीचा पुठ्यांचा गठ्ठा व ८०० रूपये किंमतीचे रिकामे ड्रम असा एकूण २ लाख ८२ हजार २८० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या चौकशीत सदरचा बनावट दारू कारखाना विशाल विनायक वाघ रा. कृषी नगर, संघमा चौक, धुळे याच्याशी संगणमत करून विशाल संजय केदार हा फुले नगरातील अतिक्रमीत घरात रहाणारा २६ वर्षीय तरूण चालवत होता. त्याला सागर पुंडलिक पिंपळे हा २६ वषीय तरुण मदत करीत असल्याचे समोर आले. या ठिकाणाहून पोलिसांनी विशाल केदार व सागर पिंपळे या दोघांना ताब्यात घेतले असून मुळ सुत्रधार विशाल वाघ हा मात्र फरार आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.