धुळे -विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाच्या तिकिटावर आपण निवडणूक लढवली, त्या पक्षाचा एकही पदाधिकारी आपल्यासोबत प्रचाराला आला नाही. त्यामुळेच माझा पराभव झाला असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला. या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
धुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना माजी आमदार अनिल गोटे... हेही वाचा....केवळ ओबीसी नाही तर प्रत्येक जातीची जनगणना झाली पाहिजे..
धुळे येथे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात झालेल्या या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार यांनी यावेळी बोलताना विधानसभा निवडणुकीत झालेल्या स्वतःच्या पराभवाची कारणमिमांसा केली. यावर बोलताना गोटे यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर सणसणीत टीका केली. विधानसभा निवडणुकीनंतर मी शरद पवार यांना भेटायला गेलो असता, माझ्या पराभवाबाबत त्यांनी विचारणा केली. त्यावेळी आपण त्यांना सांगितले होते की, ज्या पक्षाच्या तिकिटावर आपण मला निवडणुकीत उभे केले. त्या पक्षाचा एकही पदाधिकारी माझ्यासोबत प्रचाराला नसल्याने माझा पराभव झाला. ही खंत आपण शरद पवार यांच्या जवळ व्यक्त केल्याचे गोटे यांनी सांगितले.