धुळे- नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खान्देशच्या एकाही खासदाराची वर्णी लागली नाही. त्यामुळे खान्देशच्या वाट्याला एकही मंत्रीपद न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे यांना देखील मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. गेल्यावेळी सुभाष भामरेंवर संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
उत्तर महाराष्ट्रावर अन्याय; पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात खान्देशचा एकही मंत्री नाही
केंद्रीय मंत्रीमंडळात उत्तर महाराष्ट्राला एकही मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे खान्देशच्या नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळाले आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' असा नारा देत भाजप सरकारने पुन्हा एकदा देशाची सूत्रे आपल्या हातात घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या दुसऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्रातील एकाही खासदाराला संधी देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे खान्देशातून ८ ही खासदार निवडून गेले आहेत. गेल्या वेळी अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या संरक्षण खात्याची जबाबदारी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे यांच्यावर देण्यात आली होती.
सुभाष भामरे यांनी संरक्षण राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना राफेल प्रकरणाबाबत त्यांनी सरकारची बाजू सक्षमपणे मांडली होती. सुभाष भामरे हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे अतिशय जवळचे व्यक्ती म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्यामुळे यावेळी सुभाष भामरे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र सुभाष भामरे यांना डावलल्यामुळे धुळेकर नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.