धुळे - अखिल भारतीय साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी ख्रिश्चन धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरून राज्यात वाद सुरू झाला आहे. हा वाद अतिशय चुकीचा आहे. विविधतेत एकता सांगणाऱ्या भारतात अशा पद्धतीने वाद निर्माण केले जाणे हे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा, अशी मागणी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली आहे.
हेही वाचा - पीएमसी बँकेवर कारवाईचा बडगा, ६ महिन्यांसाठी आरबीआयने व्यवहार थांबवले
अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी साहित्य महामंडळाच्या वतीने ख्रिश्चन धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीली धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सबनीस यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले, भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. अनेक जाती धर्माच्या पिढ्यांचं योगदान मराठी साहित्यात असून या साहित्यिकांनी मराठी साहित्य अधिक समृद्ध केलं आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मप्रसारक असले तरी त्यांनी संत साहित्य आणि निधर्मी साहित्य अश्या प्रकारचं साहित्य मराठी साहित्यात भर घालणारे आहे.