धुळे - दरवर्षी जून महिन्यातील 15 तारिख हा संपुर्ण विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस असतो. याचे कारण प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि नव्या इयत्तेची सुरुवात ही याच दिवशी होत असते. म्हणून 15 जून हा दिवस शाळा उघडण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो.
आज (सोमवार) म्हणेच 15 जून, हा राज्यातील दिवस शाळा उघडण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांची शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. काही हसत-खेळत तर काही विद्यार्थी रडत-रडत शाळेत प्रवेश करत असतात. या दिवसापासून विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाला प्रारंभ होत असतो. मात्र, यावर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे शाळा उघडण्याचा दिवस अनिश्चित आहे. त्यामुळे दरवर्षी लहान मुलांच्या आवाजाने हसण्या-खेळण्याने दुमदुमणारा शाळेचा परिसर यंदा मात्र, शांतशांत आहे.