धुळे -शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्क प्रमुख के.पी. नाईक हे धुळे दौऱ्यावर आले असताना खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी निवडणुकीबाबत त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. सुभाष भामरे यांनी, "आपली इच्छा नसताना आपल्याला तिकीट दिले गेले आहे, तसेच महापालिका निवडणुकीत झालेला ईव्हीएमचे पाप हे आपले नसून गिरीष महाजन यांचे आहे" असे धक्कादायक विधान केले. डॉ. भामरेंच्या या विधानावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे बघणे महत्वाचे असणार आहे. हा झालेला प्रकार शिवसेनेचे नरेंद्र परदेशी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्क प्रमुख के.पी. नाईक हे दि १० एप्रिल रोजी धुळे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. यावेळी के.पी. नाईक यांची भेट घेण्यासाठी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे हे आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. शिवसेना भाजपची युती होऊन २ महिने झाले तरी तुम्ही भेट घेतली नाही, असा रोष त्यांनी डॉ. भामरेंवर व्यक्त केला.