धुळे - परिचारीका संघटनेच्या वतीने 'दोन मुठ धान्य अभियान' हाती घेण्यात आले असून या अभियानाच्या माध्यमातून संकलित होणारे धान्य गरजू पर्यंत पोहचविण्यात येत आहे. दरम्यान, परिचारिका संघटनेच्या वतीने आज बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी शहरातील तमाशा कलावंत महिलांना साड्या आणि किराणा किटचे वाटप करण्यात आले.
माहिती देताना परिचारीका संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आणि जिल्हा उपाध्यक्षा हेही वाचा -धुळे जिल्ह्यात पेट्रोल 100 पार, नागरिकांना पेट्रोल दरवाढीचा फटका
जागतिक परिचारिका दिनाच्या दिवशी जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी गरजूंच्या मदतीसाठी 'दोन मुठ धान्य' अभियान हाती घेतले. या माध्यमातून सुरवातीला सर्वच परिचारिकांनी आपल्या एैपती प्रमाणे धान्य जमा केले. या अभियानात आता इतर सामाजिक संघटनांसह व्यक्तींकडून देखील मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील धुणी भांडी करणाऱ्या ५५ महिलांना परिचारिक संघटनेच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. त्या नंतर गुऱ्हाडपाणी आणि निशाणपाणी येथील मोळी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या ८० परिवारांना परिचारिका संघटनेच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. त्यानंतर आज शहरातील भीमनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या तमाशा कलावंत महिला आणि पुरुषांपर्यंत मदत पोहचविण्यात आली.
सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे तमाशाचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. यामुळे तमाशा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. ही अवस्था लक्षात घेऊन परिचारिका संघटनेच्या वतीने यावेळी दहा महिलांना साडी भेट देण्यात आली, तसेच २० कलावंताना किराणा किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये गहू, तांदूळ, साखर, डाळ, चहा, मसाला, बिस्कीट, साबण आदींचा समावेश आहे. या वेळी परिचारिका संघटनेच्या जिल्हाध्यक्षा प्रतिभा घोडके, उपाध्यक्षा सुवर्णा सूर्यवंशी, तमाशा परिषदेचे शेषराव गोपाळ आदि उपस्थित होते.
घोडके यांनी सांगितले की, परिचारिका संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या फुड बँकेला आता मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून संकलित होणाऱ्या धान्याच्या किराणा किट तयार करून त्या गरजूंपर्यंत पोहचविण्यात येत आहेत. पुढील टप्प्यात शहरातील वेगवेगळ्या भागात गरजूंपर्यंत किराणा पोहचविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
परिचारिका संघटनेच्या वतीने दोनमूठ धान्य वाटप अभियानात किराणा किटचे वाटप करताना आत्मिक समाधान मिळते, असे सुवर्णा सूर्यवंशी सांगतात. कोरोनाच्या काळात रुग्णसेवा करत असताना हवालदिल झाले होते, त्यात या उपक्रमात काम करताना मोठे आत्मिक समाधान मिळते.
हेही वाचा -खतांच्या किंमती कमी करून आणल्याबद्दल शेतकऱ्यांनी केला खा. डॉ. भामरेंचा सत्कार