धुळे- पोलीस मदत कक्षातील १०० ऐवजी आता ११२ हा नंबर राज्यात नव्हे तर देशात लागू करणात येणार आहे. ११२ नंबर डायल केल्यावर पोलिसांची तात्काळ मदत मिळणार आहे. वाढती गुन्हेगारी लक्षात घेत पोलीस यंत्रणादेखील सतत नवनवीन बदल करत आहे.
तात्काळ मिळणार पोलिसांची मदत!
आपण कुठल्या संकटात सापडलो किंवा पोलिसांची मदत आपल्याला हवी असेल तर आपण १०० नंबर डायल करतो. हा कॉल पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षाला लागतो आणि मग पुढील कारवाई होते. आता मात्र पोलिसांच्या मदतीचा हा नंबर लवकरच बदलणार आहे. १०० ऐवजी आता ११२ नंबर डायल केल्यावर नागरिकांना पोलिसांची मदत मिळणार आहे. या बदलाची तयारी महाराष्ट्रातील संपूर्ण पोलीस विभागात केली जात आहे. ११२ नंबरची सुविधा सुरू झाल्यावर खास मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या कक्षात मदत अपेक्षित असलेल्या व्यक्तीचा कॉल जाईल. तिथून संबंधित जिल्ह्याला कॉल आलेल्या व्यक्तीची माहिती आणि समस्या सांगितली जाईल. या माहितीच्या आधारे संबंधित पोलीस आपली अत्याधुनिक वाहने घेऊन घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन माहिती भरतील आणि आवश्यक मदत अथवा काही गुन्हा घडला असेल, तर ती कारवाई करतील.
पोलिसांना नवीन यंत्रणेचे प्रशिक्षण
जिल्ह्यातील विशिष्ट पोलिसांना हा नंबर बदलाच्या नवीन यंत्रणेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. संपूर्ण पोलीस दलात या नवीन नंबरबद्दल फारशी माहिती नसल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांना याबाबतचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षित पोलिसांकडे स्वतःच्या वाहनावासह त्यात टॅब, अत्याधुनिक संपर्क यंत्रणा अशा सुविधा असतील.
११२ नंबरसाठी स्वतंत्र व्यवस्था
ही यंत्रणा धुळे जिल्ह्यात कार्यान्वित करण्यासाठी ४५ पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. ११२ नंबर सुविधेसाठी आता स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात आली आहे. या सुविधेसाठी लागणारी सर्व सामुग्री ही पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाली आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची जुळवाजवळ सुरू आहे.