धुळे : जिल्ह्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर पळासनेर गावात मुंबई आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दहा जण ठार, तर 28 जण जखमी झाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. जखमींवर शिरपूर उपजिल्हा रुग्णालय, धुळे जिल्हा रुग्णालय तसेच शिरपूर येथील नगर परिषदेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच काॅटेज रूग्णालयात सात मृतदेह दाखल करण्यात आले. हा अपघात चार ते पाच वाहनांमध्ये विचित्र पद्धतीने झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नरडाणा एमआयडीसी येथे असलेल्या वंडर सिमेंटसाठी खडी भरलेला भरधाव वेगातील कंटेनरने चालकाचा ताबा सुटल्याने आधी एका कारला मागून धडक दिली.
अपघातातील वाहनचालकाचाही मृत्यु :अपघाताची माहिती मिळताच आमदार काशिराम पावरा, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातातील जखमींवर शिरपूर, धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील वाहनचालकाचाही मृत्यु झाला आहे. अपघाताच्या कारणाचा तपास सुरु असून या अपघाताची माहिती शासनास कळविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली. अपघातातील जखमींची आमदार पावरा आणि जिल्हाधिकारी शर्मा यांनी शिरपुर रुग्णालयात जाऊन चौकशी केली. जखमींवर योग्य ते उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
असा झाला अपघात :हा अपघात लहान-मोठ्या ११ वाहनांमध्ये विचित्र पद्धतीने झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर पुढे चालणारा अन्य एक कंटेनर आणि तीन ते चार दुचाकी वाहनांना मागून धडक देऊन सदर कंटेनर महामार्गलगत असलेल्या छोट्या हॉटेलमध्ये शिरला. अपघातस्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. बघ्यांनी एकच गर्दी केली आहे. महामार्गावर खळीचा थर साचल्याने एका दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे. हा थर बाजूला करीत महामार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दोन विद्यार्थ्यांचा मृतांमध्ये समावेश :बस थांब्यावर काही विद्यार्थीही थांबले होते. त्याचवेळी हा अपघात झाला. यात अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. कंटेनरने धडक दिलेली कार एमएच 18 बीआर 5057 क्रमांकाची आहे. या कारमध्ये पती-पत्नी, दोन लहान मुले आणि चालक असे प्रवास करीत होते. पती, दोन्ही मुले आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत, तर पत्नी जागीच ठार झाल्याचे सांगण्यात (Mumbai Agra Highway Accident) आले. पोलीस अधिक्षक संजय बारकुंड हे पुढील तपास करीत आहे, तर प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात अत्यंत भयानक असल्याचे सांगितले.
मृतांची नावे अशी :प्रताप सिंग भीम सिंग गिरासे (वय 70) राहणार पळासनेर, गीता भुरी पावरा (वय १५) राहणार कोळसा पाणी पाडा, बुरी सुरसिंग पावरा (वय 28) राहणार कोळसा पाणी पाडा, सुनिता राजेश खंडेलवाल, राहणार गणपती मंदिर जवळ पंचवटी गॅस एजन्सी जीटीपी स्टॉप धुळे, कन्हैयालाल बंजारा, राहणार जावदा जिल्हा भीलवाडा मध्य प्रदेश, सूरपाल सिंग दिवाण सिंग राजपूत, राहणार बिंबा हेडा जिल्हा चितोडगड, खीरमा डेब्रा कनोजे, राहणार आंबा पाणी तालुका शिरपूर, संजय जायमल पावरा (वय ३८) राहणार कोळसा पाणी पाडा, रितेश संजय पावरा (वय 14) राहणार कोळसा पाणी पाडा यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
या वाहनांमध्ये झाला अपघात :दुचाकी क्रमांक एम एच 18 बी एस 7692, कंटेनर क्रमांक आर जे 09 जीबी 9001, दुचाकी क्रमांक 1635, दुचाकी क्रमांक एम पी 46 एम एफ 4221, सिन्नर येथील मालवाहू पिकअप गाडी क्रमांक एम एच 15, 1070, दुचाकी क्रमांक एम एच 39 आर 4687, रिकामी आणि पासिंग न झालेली स्कूल बस क्रमांक एम पी 11, टी आर डी जे 4332, अन्य एक दुचाकी विना नंबरची, धुळे येथील कार क्रमांक एम एच 18 बी आर 5075 आणि विना नंबर प्लेटची एक आयशर या लहानमोठ्या ११ गाड्या अपघाताला बळी पडल्या आहेत.