धुळे - जिल्ह्यातील शिंदखेडा येथील धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने तत्कालीन जमीन अधिग्रहण अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह ३ जणांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तत्कालीन जमीन अधिग्रहण अधिकारी, तहसीलदार आणि मध्यस्थ या तिघांकडून कामात अनियमितता झाल्याचा ठपका या समितीने अहवालातून ठेवला आहे.
हेही वाचा... धुळे: जलशुद्धीकरण केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर सरकारने धर्मा पाटील यांच्या जमिनीवर ११९ हेक्टर शेतीचे फेरमूल्याकंन केले होते. सरकारने केलेल्या फेरमूल्यांकनानंतर धर्मा पाटील यांना मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ झाली होती. धर्मा पाटील आणि त्यांच्या मुलाला ५४ लाख रुपये मोबदला देण्याचा अहवाल धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. तसेच सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्याम दरने यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने राज्य मानवी हक्क आयोगाला आपला अहवाल सादर केला होता. या प्रकरणात तत्कालीन जमीन अधिग्रहण अधिकारी प्रतिभा सपकाळे, तहसीलदार रोहिदास खैरनार, आणि मध्यस्थ दत्तात्रय देसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस या समितीने केली आहे. या तिघांनी कामात अनियमितता केल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.
धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांची चौैकशी समितीला निरपेक्ष चौकशी करण्याची मागणी खरे गुन्हेगार मोकाट, धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांचा आरोप
समितीने शिफारस केलेल्या लोकांपेक्षा खरे गुन्हेगार वेगळे असून ते मात्र मोकाट आहेत. तेव्हा सरकारने अशा मुख्य लोकांना पकडावे. या लोकांवर राजकीय वरदहस्त आहे का, हेही पहावे असा आग्रह धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण...
८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील रहिवासी होते. धर्मा पाटील यांची धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी 5 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र त्यांना या 5 एकरचा मोबदला म्हणून केवळ चार लाख रूपये देण्यात आले होते. धर्मा पाटील यांची ही सर्व जमीन सुपीक होती. यात विविध फळझाडे यांची लागवड करण्यात आलेली होती. विहीर, ठिबक सिंचन, वीजेची सोय अशी बागायती जमीन असलेल्या धर्मा पाटील यांना तुलनेने अतिशय कमी मोबदला मिळाला. त्यांनी या विरोधात संबंधित विभागाकडे साधारणतः 3 महिने प्रकरणाचा पाठपुरावा केला. मात्र सरकार आणि प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे त्रस्त झालेल्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून न्यायाची मागणी करणाऱ्या धर्मा पाटील यांचे 28 जानेवारी 2018 ला निधन झाले होते.
हेही वाचा... धुळे जिल्ह्यात शेततळ्याची योजना मंदावली; ५ महिन्यात फक्त १५० तळ्यांची निर्मिती