धुळे -शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावरील हाडाखेड शिवारात ढाब्यावर उभ्या असलेल्या एका कंटेनरमधून गुटखा तंबाखूची तस्करी होत असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धडक कारवाई करत याठिकाणाहून २० लाखांच्या कंटेनरसह ८ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
हेही वाचा... भीमा-कोरेगाव हिंसाचार : दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबूंच्या घरी पुणे पोलिसांचा तपास
धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावरील हाडाखेड गावाजवळ असलेल्या हरियाणा मेवात नावाच्या धाब्यावर एक संशयित कंटेनर उभा असून त्यामधून गुटखा आणि तंबाखूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी याठिकाणी जाऊन पाहणी केली असता 'आरजे १४/जीए ३९४६' या क्रमांकाचा कंटेनर उभा असलेला दिसला. या कंटेनरमधील मालाबाबत पोलिसांनी विचारणा केली असता, पोलिसांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. या कंटेनरची पोलिसांनी पाहणी केली असता त्यात विविध वस्तूंसह सुगंधित गुटखाजन्य पानमसाला मोठ्या प्रमाणात आढळून आला.