धुळे -विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मंगळवारी दोन्ही जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना साहित्यांचे वाटप करण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय जाधव यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. निवडणुकीसाठी भाजपाकडून अमरीश पटेल तर महाविकास आघाडीकडून डॉ. अभिजीत पाटील हे रिंगणात आहेत. दरम्यान, धुळे-नंदुरबार विधानपरिषद मतदारसंघात भाजपाचे पारडे जड असल्याने ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सकाळी आठ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दोन्ही विधानपरिषद मतदारसंघातून 437 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी दहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन तारखेला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.
हेही वाचा -लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार; कास्टिंग डायरेक्टरविरोधात गुन्हा दाखल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी घेण्यात आली आहे काळजी -
मतदान प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना मास्क तसेच सॅनिटायझर, हॅन्डग्लोव्ह्ज यांचे वाटप करण्यात आले आहे. मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराची थर्मामीटरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.
उमेदवार कोण?
विधान परिषद निवडणुकीसाठी धुळे-नंदुरबार मतदारसंघात सरळ लढत आहे. भाजपाकडून अपेक्षेप्रमाणे अमरिशभाई पटेल हे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीने शहरातील अभिजीत मोतीराम पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. दुसरीकडे महाआघाडीचे नेते एकनाथराव खडसे, धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे आणि इतर नेत्यांचा कस लागणार आहे. एकनाथराव खडसे यांनी भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधल्याने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलतील, असा अंदाज लावला जात आहे. खडसे भाजपाला किती डॅमेज करतात? त्याची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.
खडसे यांचा बालेकिल्ला जळगाव जिल्हा मानला जात असला तरी उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्येही त्यांचा प्रभाव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
असे आहे मतांचे समीकरण -
धुळे-नंदुरबार विधान परिषदेसाठी एकूण 438 मतदार आहेत. धुळ्यातून 238, नंदुरबारमधून 200 मतदार मतदान करू शकणार आहे. पक्षीय बलाबलाचा विचार करता भाजपाकडे धुळ्यात 169 तर नंदुरबारमध्ये 70, अशी 239 मते आहेत. महाविकास आघाडीकडे धुळ्यात 69, नंदुरबारमध्ये 130, अशी 199 मते आहेत. तर एमआयएमकडे पाच मतांचा कोटा आहे. त्यामुळे आजच्या घडीला भाजपाचे पारडे जड दिसत आहे. मात्र, खडसे कोणती कमाल दाखवितात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.