महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कचरा विलगीकरण कागदावरच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका निष्काळजीच - corona

राज्यासह देशात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सर्वत्र स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. असे असताना धुळे पालिकेच्या कचरा विलगीकरण प्रक्रियेचे काहीही काम होत नाही. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निष्काळजीपणा समोर येत आहे.

कचरा डेपो
कचरा डेपो

By

Published : Mar 19, 2020, 4:38 PM IST

Updated : Mar 19, 2020, 5:26 PM IST

धुळे- शहरातील कचरा डेपो येथे कचरा विलगीकरण प्रक्रिया अर्थात बायो मायनिंग प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यानंतर हा प्रकल्प बंद पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कचरा डेपोत साचलेली घाण ही कोरोना पसरवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. पालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कचरा विलगीकरण कागदावरच

राज्यासह देशात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्हा पातळीवर पालिका प्रशासन नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करत आहे. धुळे महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांमध्ये या कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

मात्र, कोट्यावधी रुपये खर्च करून कचरा डेपोत सुरू करण्‍यात आलेला बायोमायनिंगचा प्रकल्प सध्या बंद पडला आहे. शहरातील वरखेडी रोडवरील कचरा डेपोत संपूर्ण शहराच्या विविध भागातून संकलित केलेला कचरा टाकला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून याची विल्हेवाट लावण्यासाठी तसेच त्यापासून खत निर्मिती करण्यासाठी नाशिक येथील बी जे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 3 कोटी 76 लाख रुपयांचा बायो मायनिंगचा प्रकल्प राबविण्यासाठी ठेका देण्यात आला आहे. मागील चार महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.

कचरा डेपोमुळे पसरणारी दुर्गंधी तसेच घाणीचे साम्राज्य कमी होण्यास या प्रकल्पामुळे मदत होणार होती. मात्र, प्रकल्पाचे उद्घाटन होऊन देखील अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. याठिकाणी 5 पोकलँड मशीनची आवश्यकता असताना फक्त एकच पोकलँड मशीनच्या आधारे कचरा एकत्र करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वाचे असणारे कचरा वेगळा करण्याचे मशीन अद्याप मिळाले नसल्याने या कामाला स्थगिती आली असल्याची माहिती येथे काम करणार्‍या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. एकीकडे कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे कचरा डेपोच्या अस्वच्छतेमुळे हा आजार धुळे शहरात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचरा डेपोच्या मार्गावरून धुळे तालुक्यातील विविध गावांमधील नागरिक मुख्य शहरात येत असतात. या ठिकाणी असलेल्या दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे या नागरिकांना संसर्गजन्य आजाराची बाधा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे आवाहन करणाऱ्या पालिका प्रशासनाने कचरा डेपोची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा -कोरोना आजाराशी लढण्यासाठी वृद्धाश्रम सज्ज..

Last Updated : Mar 19, 2020, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details