धुळे - स्थानिक गुन्हेअन्वेषण विभागाने फागणे रोडवरील एका गोडाऊन मध्ये केलेल्या कारवाईत तब्बल 2 लाख 79 हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईत 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
धुळे एलसीबीने जप्त केला अडिच लाख रुपयांचा गांजा; 2 जणांना घेतले ताब्यात
धुळे जिल्ह्यात कोरड्या गांजाची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. एलसीबीने केलेल्या कारवाईत 2 लाख 79 हजारांचा गांजा जप्त करण्यात आला.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. या परिस्थितीमध्ये धुळे शहरासह जिल्ह्याच्या बाहेर देखील काही व्यक्ती कोरड्या गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी करत असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला मिळाली होती. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी याबाबतची आपल्या गुप्त माहिती दाराकडून माहिती घेतली. फागणे रोडवरील एका सिमेंटच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा साठवून तो विक्रीसाठी ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवाजी बुधवंत यांनी छापा टाकला.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 2 लाख 79 हजारांचा तब्बल 1 हजार आठशे 60 किलो कोरडा भांग याठिकाणी अवैधरित्या साठवून ठेवला असल्याचे निदर्शनास आले. याबाबत गोडाऊन मालकाची चौकशी केली असता हे गोडाऊन भाडेतत्वावर दिले असल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी भाडेकरुची माहिती घेऊन या व्यक्तीच्या विरोधात यासंदर्भातील गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास करण्यात येत आहे.