धुळे - जिल्ह्यासह खान्देशात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढत झाली आहे. उपाययोजना करुनही रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रा(एनआयव्ही)कडे या विषाणूचा सखोल अभ्यास करण्याची मागणी केली आहे.
कोरोना विषाणूचे सखोल संशोधन करावे; धुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाची एनआयव्हीकडे मागणी
धुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रा(एनआयव्ही)कडे या विषाणूचा सखोल अभ्यास करण्याची मागणी केली आहे. प्रादेशिक घटक कोरोना विषाणूच्या क्षमतेमध्ये काही परिणाम करत असल्यास आपल्याला उपचार पद्धती बदलावी लागेल. त्यामुळे कोरोनाचा प्रसार व रुग्णांचा वाढता मृत्यूदर रोखण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
खान्देशातील रुग्णांचा आणि विषाणूचा सखोल अभ्यास केल्यास रुग्णांवर उपचार करताना मदत होईल. प्रादेशिक घटक कोरोना विषाणूच्या क्षमतेमध्ये काही परिणाम करत असल्यास आपल्याला उपचार पद्धती बदलावी लागेल. त्यामुळे कोरोनाचा प्रसार व रुग्णांचा वाढता मृत्यूदर रोखण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी गेल्या काही दिवसांत मृत्यूदर कमी झाला आहे. धुळे जिल्ह्यातील सध्याचा मृत्यूदर 4.8 वर आला असून त्याबाबत प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. प्रशासनाने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवल्याने रुग्णांची संख्या समोर येत आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून शिरपूर तालुक्यात आत्तापर्यंत ४११ रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर 71.42 टक्क्यांवर गेला आहे. शहरासह ग्रामीण भागातदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये देखील वाढ झाली आहे. कोरोनाचा उद्रेक वाढत असला तरीही नागरिकांकडून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, तरीही बाजारपेठेतील गर्दी कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे. यावर प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी काही नागरिकांनी केली आहे.