धुळे -अमरीश पटेल यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या ८ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसचे आमदार अमरीश पटेल यांचा भाजप प्रवेश निश्चित ?
धुळ्यातील शिरपूरचे काँग्रेसचे आमदार अमरीश पटेल यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींना वेग आला आहे. आमदार अमरीश पटेल हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
राज्यात विरोधी पक्षातले विविध लोकप्रतिनिधी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह भाजपात मोठ्या प्रमाणावर प्रवेश करत आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील विधानपरिषदेचे आमदार अमरीश पटेल हे देखील लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती सूत्रांनी दिली आहे. अमरीश पटेल यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेऊन शिरपूर शहराचा विकास केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने ८ ऑगस्ट रोजी धुळे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमरीश पटेल यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेस आणि भाजपमधील समीकरणे बदलणार असे दिसत आहेत. पटेल यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण असून त्यांच्यासारखी व्यक्ती भाजपात आल्यास धुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.