धुळे - विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या विविध मतदारसंघांप्रमाणे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. गेल्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर अनिल गोटे हे विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत देखील ते इच्छुक असून लोकसंग्राम या पक्षाकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवली जात असली तरी अनिल गोटे हे शिवसेनेचे उमेदवार असू शकतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत अनिल गोटे हे पुन्हा विजयी होतात का ? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
संपूर्ण राज्यात धुळे जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. हा जिल्हा नेहमी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिलेला आहे. कधी धवल क्रांतीचे शहर म्हणून धुळे शहराची ओळख होती. मात्र आज ही ओळख पूर्णपणे पुसली गेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघातील समस्या आजही कायम आहेत.
हेही वाचा- अमरावती विधानसभा आढावा : आमदार डॉ. सुनील देशमुख यांना कोण आव्हान देणार?
राजकीय दृष्ट्या धुळे शहर माजी आमदार अनिल गोटे यांच्या नावाने ओळखलं जाते. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत महत्वाचे नाव म्हणून अनिल गोटे यांचे नाव घेतले जाते. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे हे भाजपच्या तिकिटावर उभे होते. अनिल गोटे हे ५७ हजार मताधिक्यांनी निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या राजवर्धन कदमबांडे यांचा पराभव केला होता. मात्र गेल्या ५ वर्षात अनिल गोटे यांचे भाजपशी बिघडलेले संबंध पाहता या निवडणुकीत त्यांना आपल्या लोकसंग्राम पक्षाकडून निवडणूक लढवावी लागणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. मात्र असे असले तरी अनिल गोटे हे शिवसेनेचे उमेदवार असू शकतील, अशी शक्यता देखील राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
हेही वाचा- आढावा उस्मानाबाद विधानसभेचा : राजेनिंबाळकरांना थोपवण्यासाठी पाटील जाणार भाजपत?