धुळे : शहरातील मोगलाई भागात समाजकंटकांनी एका धार्मिकस्थळी मूर्तीची विटंबना केल्याची घटना बुधवारी सकाळी निदर्शनास आली. संतप्त नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा फौजफाटा दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. विविध जाती-धर्माची संमिश्र वस्ती असलेल्या मोगलाईत तणावपूर्ण शांतता आहे. सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नागरिकांना शांततेचे केले आवाहन: धुळे शहरात साक्री रोडवरील मोगलाई भागात ही घटना घडली आहे. त्यामुळे सकाळी सहा वाजेपासून नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. नागरिकांच्या भावना अतीशय तीव्र झाल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्यासह शहर पोलिसांचे पथक दाखल झाले. पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून बंदोबस्त तैनात केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
राजकीय पुढाऱ्यांची धाव : या घटनेची माहिती मिळतात विविध राजकीय पक्षाच्या पुढार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थायी समितीच्या सभापती किरण कुलेवार, नगरसेवक सुनील बैसाणे, सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलेवार, शिवसेनेचे मनोज मोरे, संजय वाल्हे, महेश मिस्तरी, अॅड. रोहित चांदोळे, प्रशांत मोराणकर, डॉ. योगेश पाटील, राकेश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक नाना वाडीले, राजेंद्र वाडीले, छोटू वाडीले, विठोबा वाडीले, सुरेश जावरे, कमलबाई जावरे, रंजनाबाई वाडीले, हिराबाई वाडीले, सरलाबाई वाडीले, मंगलाबाई वाडीले, आशाबाई वाडीले, मीराबाई वाडीले, प्रमिलाबाई वाडीले आदींनी समाजकंटकांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.