धुळे- केंद्र सरकारने 8 जूनपासून पहिला अनलॉक जाहीर केला आहे. यात मंदिरे उघडण्याची देखील परवानगी दिली आहे. धुळे शहरातील विविध मंदिरे सोमवारी उघडण्यात आली होती. संकष्टी चतुर्थीनिमित्त शहरातील सिद्धेश्वर गणेश मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. मात्र, यावेळी भाविकांकडून तसेच मंदिर प्रशासनाकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.
धुळ्यातील श्री सिद्धेश्वर गणेश मंदिरातील दृश्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. टाळेबंदीच्या काळात संपूर्ण देशभरातील विविध आस्थापने तसेच धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारच्या वतीने सोमवारपासून पहिला अनलॉक जाहीर करण्यात आला आहे. यात धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणतेही आदेश काढले नसून यामुळे मंदिर प्रशासनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदीर प्रशासनाला शासनाचे आदेश प्राप्त न झाल्याने मंदिर प्रशासनाच्या वतीने मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.
संकष्टी चतुर्थी निमित्त शहरातील सिद्धेश्वर गणेश मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी भविकांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद आणि तीर्थ देऊ नये, तसेच भविकांकडून हार, फुले स्वीकारू नये, असे आदेश असताना देखील मंदिरात या नियमांचे उल्लंघन झाले.
हेही वाचा -धुळे: जिल्ह्यातील कोरोना बधितांचा आकडा 248 वर