धुळे - लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
मुख्य बाजारपेठा जगबजल्या
दिवाळी सणातील अत्यंत महत्त्वाचा असलेला लक्ष्मी पूजनाचा सण शनिवारी साजरा करण्यात आला. लक्ष्मी पुजनानिमित्त धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोड भागात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पूजेसाठी लागणारे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीने सोशल डिस्टंन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता.
लक्ष्मीपूजनानिमित्त बाजारपेठेत लक्ष्मीच्या मूर्ती झेंडूची फुले पूजेचे साहित्य अशा विविध वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली होती. यावेळी चिनी मातीच्या लक्ष्मी मूर्ती खरेदी करण्यावर नागरिकांनी भर दिला होता.
झेंडूच्या फुलांची आवक वाढली
दसऱ्यानंतर अवघ्या वीस दिवसांनी दिवाळीचा सण साजरा होत आहे. यामुळे झेंडूच्या फुलांची बाजारपेठेत आवक वाढली असून दीडशे रुपये किलो या दराने झेंडूच्या फुलांची विक्री झाली.
सोने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळी सणातील अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी सोने खरेदीला महत्त्व आहे. शहरातील विविध सराफांकडे नागरिकांनी सोने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा -यूपीमधील हाथरस आरोपींना फाशी द्या, धुळ्यात वाल्मिकी-मेहतर समाजाचा आक्रोश मोर्चा
हेही वाचा -धुळ्यात चोरट्यांनी फोडले ॲक्सिस बँकेचे एटीएम, चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये रोष