धुळे-संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. मात्र, भाजप सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं.
धुळ्यात भाजप सरकारच्या कामगिरी विरोधात काँग्रेसचं आंदोलन - धुळे आंदोलन बातमी
धुळ्यात विविध मागण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी धुळे तालुक्यातील शेतकरी आणि विविध ग्रामपंचायतींचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण राज्यात एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. देशातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठवड्यात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत प्रचंड वाढली. जनसामान्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योगधंदे बंद होत आहेत. बेरोजगारीत दिवसेंदिवस भर पडत आहे. बँकिंग अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होत नाही. देशासह महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात आर्थिक संकट कोसळले आहे.
या मागण्यांसाठी केले आंदोलन
ऑक्टोबर महिन्यात धुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, मका, कांदा, कापूस आणि फळबागा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फिस त्वरित माफ करा, सर्व शेती पिकांचे पंचनामे त्वरित करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान मिळावे, पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, कृषीपंपाचे वीज बिल माफ करावे, अतिवृष्टीमुळे दगावलेल्या मेंढ्यांची आणि ग्रामीण शहरी भागात पडझड झालेल्या घरांची नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी धुळे तालुक्यातील शेतकरी आणि विविध ग्रामपंचायतींचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.