धुळे- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार काशीराम पावरा आणि साक्री विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डी एस अहिरे हे आज (सोमवार) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, मात्र, याबाबत या दोनीही विद्यमान आमदारांकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा - काँग्रेसची ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीमधील दिग्गज नेते आणि पदाधिकारी भाजप-शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश करत आहेत, धुळे जिल्ह्यातदेखील काँग्रेसला सोमवारी मोठं खिंडार पडणार असल्याची शक्यता आहे,
जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार काशीराम पावरा आणि साक्री विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डी एस अहिरे हे मुंबईत होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडणार असून याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा - विधानसभा की लोकसभा पोटनिवडणूक? दोन दिवसात निर्णय - पृथ्वीराज चव्हाण
या प्रवेशाबाबत आमदार काशीराम पावरा यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संपर्क साधला असता काशीराम पावरा यांनी असे काहीही ठरले नसल्याचे सांगत याबाबत स्पष्ट बोलण्यास नकार दिला. तर, साक्रीचे विद्यमान आमदार डी एस अहिरे यांचा फोन सकाळपासून नॉटरिचेबल येत असल्याने त्यांच्याकडून कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही, मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या प्रवेशाची वार्ता राजकीय वर्तुळात पसरताच विविध चर्चांना उधाण आले आहे.