धुळे -कोरोना आजाराच्या भीतीने धास्तावलेले परराज्यातील नागरिक तसेच अन्य जिल्ह्यातील नागरिक आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाले आहेत. मात्र, वाहनांची व्यवस्था नसल्याने त्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरून नागरिक मोठ्या प्रमाणावर जातानाचा चित्र पाहायला मिळत आहे. आजवर आपले मूळ गाव सोडून मुंबईसारख्या मायानगरीत आलेल्या अनेकांना पोटापाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. आता जगेल की नाही, हाच प्रश्न त्यांना पडला आहे.
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव संपूर्ण देशभरात आणि राज्यात हळूहळू वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला आजाराची लागण होत आहे. आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभर लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या परराज्यातील नागरिकांना तसेच अन्य जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी वाहनांची सोय उपलब्ध नाही. मात्र, आजाराच्या भीतीने परराज्यातील नागरिकांचे जथे आता आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाले आहेत.