धुळे- उत्तर महाराष्ट्रात म्हशींच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिध्द असलेला बाजार समितीतील आठवडी बाजार गत काही दिवसांपासुन मंदावला होता. अनलॉक नंतर भरलेल्या या बाजारात आज चांगलीच गर्दी झाली होती. बाजारात गुरांच्या खरेदी विक्रीसाठी शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने दाखल झाले होते.
पाच महिन्यापर्यंत बाजार पुर्णपणे ठप्प
कोरोनाच्या संकटामुळे मार्च ते ऑगस्ट असा पाच महिन्यापर्यंत बाजार पुर्णपणे ठप्प होता. संचारबंदीमुळे गुरांच्या खरेदी विक्रीवर देखील महिनाभर नियंत्रण आले होते. कोविडचे रुग्ण कमी झाल्यानंतर देखील बाजारात गाई, म्हशींच्या खरेदी-विक्रीवर संचारबंदीचा परिणाम जाणवत होता.
बैलांच्या किंमतीत तेजी
सोमवारी सर्वकाही खुले झाल्यानंतर भरलेल्या पहिल्याच आठवडी बाजारात चांगलीच रेलचेल दिसुन आली. सकाळी शेळ्या मेंढ्याच्या बाजार, कोंबड्यांच्या बाजारात मोठी गर्दी झाली होती. शिवाय ११ वाजेनंतर गाई आणि बैलांच्या बाजारात देखील ग्राहक आणि विक्रेत्यांची गर्दी पहावयास मिळाली. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शिवाय सलगच्या लॉकडाऊनमुळे आठवडी बाजारात बैलांच्या किंमती देखील तेजीत राहिल्या. थेट औरंगाबाद, संगमनेर, नाशिक येथुन शेतकरी बैलांच्या खरेदीसाठी दाखल झाले होते.
हैद्राबाद, म्हैसाणा, पठाणकोट येथुन म्हशी विक्रीसाठी दाखल
बाजार समितीत असलेल्या म्हशींच्या गोठ्यांमध्ये गत काही महिन्यांपासुन शांतता होती. मात्र आठवडी बाजाराच्या दिवशी म्हशींच्या गोठ्यांच्या परिसरात देखील चांगलीच वर्दळ दिसुन आली. हैद्राबाद, म्हैसाणा, पठाणकोट येथुन जाफराबादी, म्हैसाणा जातीच्या जातवाण म्हशी विक्रीसाठी दाखल झाल्या. या म्हशींच्या खरेदीसाठी थेट औरंगबाद, बीड, जालना येथुन शेतकरी आणि व्यापारी दाखल झाले होते. मोठ्या अवधीनंतर गुरांच्या बाजारातील व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसुन आले.
दिवसभरात दिड करोडची उलाढाल
तब्बल पाच महिन्यांपासून बंद असलेल्या म्हशींच्या बाजाराला आजपासून सुरुवात झाली आहे. दिवसभरात साधारण दिड कोटी रुपयांची उलढाल झाली. राज्यातील विविध भागातून ग्राहक धुळ्यात येतात.