धुळे - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या 56 जागांपैकी सर्वाधिक 31 जागा भाजपने जिंकल्या. राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेनाच्या महाविकास आघाडीचा येथे दारूण पराभव झाला.
धुळे जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर बुधवारी मतमोजणी पार पडली. भाजपने शिरपूर तालुक्यात 10, शिंदखेडा तालुक्यात 8, साक्री तालुक्यात 3 आणि धुळे तालुक्यात 10 याप्रमाणे 31 गटात विजय मिळवला. काँग्रेसने 5, राष्ट्रवादी काँग्रेसने 2 आणि शिवसेनेने 3 गटांमध्ये विजय मिळवला तर दोन अपक्ष उमेदवार निवडून आले.
हेही वाचा - ..म्हणून भाजपच्या बालेकिल्ल्याला पडले भगदाड; 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट!
बहुमतासाठी लागणाऱ्या जागा घेऊन भाजपने जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे भाजपचा विजय धुळे जिल्ह्याच्या राजकारणात ऐतिहासिक मानला जात आहे. धुळे जिल्हा परिषदेवर काँग्रेससोबत सत्ता गाजवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत दारूण पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्ष किरण शिंदे आणि माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांच्या पराभवाने सर्वात मोठा धक्का बसला. किरण शिंदे यांचा भाजपच्या संग्राम पाटील यांनी पराभव केला तर किरण पाटील यांना आर्वी गटात भाजपच्या शोभा पाटील यांनी पराभूत केले.
धुळे तालुक्यातील 15 गटांपैकी भाजपने अकरा गट आपल्याकडे खेचून घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यात एकही जागा जिंकता आली नाही. शिरपूर तालुक्यात 14 गटांपैकी भाजपने सर्वच 14 गटांमध्ये विजय मिळवला. माजी मंत्री आणि आमदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शिंदखेडा तालुक्यात आपले वर्चस्व सिद्ध केले. शिंदखेडा तालुक्यात दहापैकी आठ गटांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले.