धुळे - जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले आहे. यामुळे या कार्यकर्त्यांच्या वतीने शहरात हुंकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात कार्यकर्त्यांनी पक्षाविषयी नाराजी व्यक्त करीत मतदारांनी उमेदवारांच्या पाठीशी उभे रहावे आणि भाजपच्या उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन भाजपचे प्रवक्ते संजय शर्मा यांनी यावेळी केले. भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना किंमत राहिली नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या ७ जानेवारीला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. भाजपने स्वबळावर ही निवडणूक लढवत उमेदवार दिले आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाआघाडी करत उमेदवार उभे केले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भाजपमध्ये अनेकांनी मोठ्या संख्येने प्रवेश केले. मात्र, ऐन तिकीट वाटपाच्या वेळी भाजपने निष्ठवंत कार्यकर्त्यांना डावलून आयारामांना संधी दिली. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. म्हणून या कार्यकर्त्यांनी एकत्र येत भाजपविषयी नाराजी व्यक्त केली.