शिरपूर पोलिसांनी कारवाईत जप्त केलेला ट्रक धुळे : राजस्थान येथून कर्नाटककडे अफू घेऊन जाणाऱ्या एका ट्रकसह सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल शिरपूर तालुका पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. तर, शिरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
शिरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांची वाहतूक आणि साठवणूक करणार्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. मात्र, अमली पदार्थांची साठवणूक, वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धुळे जिल्हा पोलीस दलाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिरपूर तालुक्यातून सुमारे 2 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत अफूची वाहतूक रोखली आहे.
राजस्थान येथून एक ट्रक (क्रमांक एमपी 44 एचए 0547) अफूची बोंडे असलेला अमलीपदार्थ वाहतूक करून कर्नाटक येथे घेऊन जाणार असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यासमोरील महामार्ग क्रमांक तीनवर सेंधवाकडून येणाऱ्या रस्त्यावर पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने नाकाबंदी लावून सापळा तयार केला. माहितीप्रमाणे संशयित ट्रक सेंधवाकडून येत असतांना नाकाबंदीच्या पोलिसांनी ट्रक थांबविला.
चालकाला विचारपूस केली असता ट्रकमध्ये काहीच नसल्याचे त्याने सांगितले. यावेळी पोलिसांनी ट्रकची तपासणी केली मात्र, ट्रक रिकामा आढळून आला. केबिनमध्येदेखील पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे पोलीस ट्रकच्या टपावर चढले, तेव्हा त्यांना टपावर एक लोखंडी झाकण दिसले. झाकण उघडून पाहताच, केबिनवर ट्रॉलीच्यामध्ये एक छुपा कप्पा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या कप्प्यात काळ्यापांढर्या रंगाच्या गोण्या दिसून आल्या. गोण्या खाली उतरवून त्यांची पाहणी केली असता त्यात अफूची सुकलेली बोंडे आढळून आली. या 104 किलो वजनाच्या अफूची किंमत 10 लाख 47 हजार रुपये इतकी आहे.
पोलिसांनी 20 लाख रुपये किंमतीच्या ट्रकसह मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ट्रकचालक रघू कन्हैयालाल दायमा (राहणार दमा, खेडी तालुका सीतामहु, जिल्हा मंदसोर, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ राजू भुजबळ, डीवायएसपी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पीएसआय नरेंद्र खैरनार, दीपक वारे संजय देवरे, राजेंद्र सोनवणे, संजीव जाधव, संतोष देवळे शामसिंग पावरा, योगेश दाभाडे, राजेंद्र पवार, सईद शेख आदींनी केली.