धुळे - देशात टिकटॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चीनी अॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम '६९-अ'मध्ये दिलेल्या तरतुदींचा वापर करुन सरकारने हा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेला तसेच सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणारी ही अॅप्स आहेत. त्यामुळे, या अॅप्सना देशात बंदी घालण्यात आली आहे.
भारतात 'चिनी' अॅपला बंदी; खान्देशातील 'टिकटॉक स्टार' चिंतेत या अॅपमध्ये सर्वात जास्त वापर करत असलेल्या टिकटॉकचे युजर सध्या चिंतेत आहेत. खान्देशात राहणारे धुळे जिल्ह्यांमधील साक्री तालुक्यातील जामदा गावात असलेले दिनेश पवार हे टीकटॉक स्टार चांगलेच प्रसिद्ध झाले होते. दिनेश पवार आणि त्यांच्या दोन पत्नींना टिकटॉकवर तब्बल 3.4 मिलियन फॉलोअर्स होते. टिकटॉकमुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.
हेही वाचा -शेती आपली अन्नदाता; तिची पूजा केलीच पाहिजे..! आमदार भास्कर जाधव शेतीकामात व्यस्त
सरकारने टॉकटॉक अॅप बंदीचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. टिकटॉक बंद झाले त्यावेळेस त्यांच्या पत्नी अक्षरश: रडल्या, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, आम्ही लोकांचे मनोरंजन करू शकत होतो. सरकारने जो निर्णय घेतला तो चांगलाच आहे, असे म्हणत त्यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थनही केले.
टिकटॉकवरील दिनेश पवार -
दिनेश पवार 90 च्या दशकातील बॉलिवूड चित्रपटांमधील गाण्यांवर नृत्य करायचे. यानंतर त्याचा टिकटॉक व्हिडिओ तयार करायचे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या दोन्ही पत्नीदेखील असायच्या.
सध्या त्यांना या टिकटॉकमुळे कंपनीकडून कुठलाही मोबदला मिळाला नाही, असेही त्यांनी सांगितले. आता भारतामध्ये टिकटॉकसारखे दुसरे अॅप्लिकेशन लॉन्च होईल याची आम्ही वाट पाहत आहोत, असे पवार यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. सध्या ते आपल्या शेतामध्ये रमलेले आहेत. आपल्या परिवारासह शेताच्या मशागतीमध्ये ते व्यस्त आहेत. तर लवकरच लोकांच्या मनोरंजनासाठी येऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.