धुळे - शहरातील 140 वर्षांची परंपरा लाभलेला भगवान बालाजीचा रथोत्सव कोरोनाच्या संकटामुळे प्रथमच रद्द करण्यात आला असून, अत्यंत साध्या पद्धतीने विधिवत पूजन करून यंदाचा उत्सव साजरा केला जाणार आहे. भगवान बालाजीचा रथोत्सव रद्द झाल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.
140 वर्षांची परंपरा होणार खंडित, धुळ्यातील बालाजीचा रथ उत्सव रद्द
शहरातील 140 वर्षांची परंपरा लाभलेला भगवान बालाजीचा रथोत्सव कोरोनाच्या संकटामुळे प्रथमच रद्द करण्यात आला आहे.
धुळे शहरातील भगवान बालाजीचे मंदिर अतिशय प्राचीन असून, या ठिकाणी वर्षभर विविध सण उत्सव साजरे केले जातात. मंदिराचे विश्वस्त काकड यांच्या पूर्वजांना भगवान बालाजींनी स्वप्नात दृष्टांत देऊन मंदिर बांधण्याची आज्ञा केली होती. या भगवान बालाजींचा रथोत्सव दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात एकादशीला मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. या उत्सवासाठी संपूर्ण धुळे जिल्ह्यातूनच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येत असतात.
तसेच संपूर्ण नवरात्रोत्सवाच्या काळात विविध वहने निघत असतात. मात्र, यंदा कोरोनाचे आलेले संकट पाहता राज्य शासनाने मंदिरे उघडण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. तसेच सण उत्सव साजरे करण्यावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे गेल्या 140 वर्षांची परंपरा लाभलेला बालाजीचा रथोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. मात्र, ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी रथाचे साध्या पद्धतीने पूजन केले जाणार आहे. भाविकांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.