धुळे -शेत जमिनीच्या मोजणीसाठी शासकीय चलन काढून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सिटीसर्वे मुख्यालय सहाय्यकाला धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणामुळे धुळे जिल्ह्यातील लाच घेणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
अशी झाली कारवाई
तक्रारदाराचे चिंचवार येथे स्वतःच्या मालकीचे शेत आहे. त्यांना शेतीची हद्द मोजणी करायची असल्याने त्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे अर्ज केला होता. जमिनीच्या मोजणीसाठी शासकीय चलन काढून देण्याच्या मोबदल्यात मुख्यालय सहाय्यक सुनील वसंत धामणे यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपयाची लाचेची मागणी केली. त्यानुसार आज (मंगळवार) धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत सुनील धामणे यांना 1 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.