धुळे - भाजप नेते आशिष शेलार यांनी पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. शेलार हे धुळे दौऱ्यावर आले होते. पूरग्रस्त भागाची व्याप्ती व सर्व पंचनामे न करताच हे पॅकेज जाहीर केले असल्याचे शेलार म्हणाले.
हेही वाचा -राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही; शरद पवार-अमित शाह भेटीनंतर अंजली दमानियांचं ट्विट
पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शब्द का फिरवला? तुम्ही स्वतः म्हणाले होतात मी पॅकेज देणारा मुख्यमंत्री नाही, मी मदत देणारा मुख्यमंत्री आहे. मग जी तातडीची मदत या पूरग्रस्त भागातील लोकांना मिळायची होती ती अजून संपूर्ण मदत का मिळाली नाही? ती मदत का पोहोचवली नाही याचे उत्तर देणे अपेक्षित आहे. राज्य सरकारचे पॅकेज संपूर्ण अभ्यास अंतर्गत आहे, असं आम्हाला वाटत नाही. ही मदत तोकडी आहे, याचं कारण संपूर्ण पंचनामे अजून झालेच नाहीत. संपूर्ण पंचनामे न करता आणि संपूर्ण व्याप्ती जाणून न घेता घोषित केलेले हे पॅकेज आहे, असे शेलार यांनी सांगितले.
भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे ट्विट अंजली दमानिया यांनी केले होते. कोण कोणाला भेटतो हा त्यांचा व्यक्तींक प्रश्न आहे. केंद्रात बसलेले मंत्री हे सर्वच नेत्यांना भेटतात हे मला माहिती आहे. मी वास्तववादी कार्यकर्ता असल्यामुळे आज मी एवढंच सांगेन, भाजप सक्षम विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करेल, अंजली दमानिया यांच्या ट्विटरवर मी कोणतेही भाष्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.