धुळे - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्याचे परिणाम धुळे जिल्ह्याच्या राजकारणावर होणार आहे. माजी आमदार अनिल गोटे हे गुरुवारी शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विविध समीकरणामुळे अनिल गोटे यांचा काही मतांनी पराभव झाला. त्यामुळे तब्बल ३ टर्म धुळे शहराचे आमदार असलेले अनिल गोटे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. धुळे शहर विकासासाठी सक्षम लोकप्रतिनिधी हवा अशी मागणी आजही कायम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात अधिकृतरीत्या प्रवेश करून विधान परिषदेच्या मार्ग सुकर होऊ शकतो, हे लक्षात घेत गोटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असावा. दरम्यान शहरात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीकडेही सक्षम नेतृत्व नाही. गोटे यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीला पुन्हा नवीन उत्साह मिळून त्याचा फायदा जिल्हा परिषद निवडणुकींसाठी होऊ शकतो.