धुळे -आमदार जयकुमार रावल यांच्या फार्महाऊसवर बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांनी एक हजार कार्यकर्त्यांसमवेत दोंडाईचा पोलीस ठाण्यात जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अनिल गोटे हे आपल्या ठरावीक कार्यकर्त्यांसोबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात शुक्रवारी हजर झाले. यावेळी गोटे आणि रावल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत केले.
जयकुमार रावल यांच्या दोंडाईचा टाकरखेडा येथील फॉर्म हाऊसमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करून, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार अनील गोटे यांच्याविरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर एक हजार कार्यकर्त्यांसोबत पोलीस स्टेशनला हजेरी लावणार असल्याचे गोटे यांनी सांगितले होते. मात्र आज ठराविक कार्यकर्त्यांना घेऊन गोटे पोलीस स्टेशनला हजर झाले.
अनिल गोटे यांची पोलीस ठाण्यात हजेरी माझ्याविरोधात खोटी तक्रार - गोटे
अनिल गोटे व आमदार जयकुमार रावल यांच्यामधील वाद सध्या शिगेला पोहोचला आहे. आमदार जयकुमार रावल यांच्या टाकरखेडा येथील फार्म हाऊसवर अनिल गोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर प्रवेश केल्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. सुरक्षारक्षक प्रतापसिंग गिरासे यांनी गोटे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यावर स्पष्टीकर देताना गोटे म्हणाले की, रावल यांच्या फार्महाऊसवर रात्री - अपरात्री महिलांचं येणं जाणं सुरू असतं, असे मला कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले होते. याची सत्यता तपासण्यासाठी मी फार्महाऊसवर गेलो होतो. तिथे कोणताही वाद झाला नाही. माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोटे- रावल समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक
तक्रार दाखल झाल्यानंतर आपण एक हजार समर्थकांसोबत पोलीस स्टेशनला हजेरी लावणार असल्याचे गोटे यांनी सांगितले होते. मात्र आज काही मोजक्या कार्यकर्त्यांसोबत गोटे हे पोलीस स्टेशनला हजर झाले. यावेळी गोटे रावल समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे देखील पाहायला मिळाले, अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना शांत केले.