धुळे- जिल्ह्यातील साक्री येथील अनिल बागुल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आयोगाने अनेक त्रुटी दाखवून आपला उमेदवारी अर्ज बाद केल्याचा आरोप बागुल यांनी केला आहे. याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कारवाईची त्यांनी मागणी केली आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री येथील अनिल बागुल हे आत्तापर्यंत 11 वेळा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी देखील त्यांनी 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज सादर केला होता. मात्र, या उमेदवारी अर्जात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही त्रुटी असल्याचे अनिल बागुल यांना सांगितले. या त्रुटींची पूर्तता करण्यास त्यांना सांगण्यात आले होते. ही पूर्तता पूर्ण करून 5 तारखेला आपला उमेदवारी अर्ज अधिकार्यांकडे अनिल बागुल घेऊन गेले असता, याठिकाणी ते कागदपत्रांची जुळवाजुळव करत होते. मात्र, यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्रुटींची तक्रार करत त्यांचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला.