धुळे- कोणी घर देता का रे घर, एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून हिंडत आहे, कोणी घर देता का रे घर, या 'नटसम्राट'मधील वाक्यांची प्रचिती धुळ्याच्या आनंदा जगन्नाथ थानक यांना आली आहे. धुळ्याच्या तालुक्यातील वर्धाने येथील हे वयोवृद्ध आज साक्री तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. याचे कारण होते. त्यांची मुलं आणि मुली.
आनंदा थानक यांना राजेंद्र आनंदा थानक, कल्याण आनंदा थानक, ललीता पुरोहित, ज्योतीबाई पुरोहित अशी मुलं. मुलगा, मुलगी एक समान या वाक्याप्रमाणे आनंदा यांनी आपली सर्व संपत्तीचे चार समान वाटे करून चौघांनी दिले. म्हातारपणी आपला सर्वजण मिळून सांभाळ करतील हीच त्यांची आशा होती. परंतु, मुले आणि सुना त्यांच्या पोटासाठी साध्या भाकरीसाठीही तरसवू लागले. सध्या ते एका मंदिरात राहत असून त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्या मंदिरातील लोकच करत आहेत.
आपली मुले या जगात ताठ मानेने जगावीत, यासाठी काबाडकष्ट करून, उन्हाळे, पावसाळे झेलून काही संपत्ती कमावली. आज तीच मुले त्यांच्या संपत्तीतून त्यांना हाकलून लावली आहेत. मागील चार वर्षांपासून त्यांचीच मुले त्यांची हेळसांड करत आहेत. आता त्यांना न्याय मिळावा यासाठी ते शासन दरबारी हेलपाटे मारून थकले. शेवटी त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. ते आज (शनिवार) साक्री तहसील कार्यालयात पेट्रोलची बाटली, आगपेटी घेवून ते पोहोचले. पण, साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बनसोडे, गोपनीय शाखेचे कर्मचारी अविनाश पाटोळे, निजामपूर गोपनीय शाखेचे बागुल यांनी वेळीच पोहोचत त्यांनी झाडाझडती घेतली आणि त्यांच्याजवळी पेट्रोलची बाटली, आगपेटी काढून घेतली.