धुळे- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर येथे आज भाजपचे उमेदवार काशीराम पावरा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. सभेची तयारी पूर्ण झाली असून थोड्याच वेळात सभेला सुरुवात होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर काय टीका करतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रापासून मुख्यमंत्र्यांनी आपल्या सभांना सुरुवात केली आहे. धुळे जिल्ह्यातील नेर, साक्री आणि शिरपूर येथील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या आज सभा होणार आहेत. विशेषतः शिरपूर येथे होणाऱ्या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून शिरपूर येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार काशीराम पावरा यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर काय टीका करतात आणि भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कोणता अजेंडा मतदारांसमोर ठेवतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.