धुळे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत आज दोंडाईचा येथे शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा होत आहे. मोठ्या पदासाठी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे पुन्हा जाहीर पक्ष प्रवेश करीत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या सभेआधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेला स्थानिक वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष अॅड. एकनाथ भावसार यांनी जाहीर सभेच्या समोरच एक मोठे बॅनर झळकावून, व्यंगचित्राच्या माध्यमातून शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती जनतेसमोर आणली आहे. दोंडाईचा मेळावा घेणाऱ्यांनी पक्षासाठी कधीही काम केले नाही तर त्यांनी सतत पक्षात राहून भारतीय जनता पक्षाचे काम केले, असा गंभीर आरोप भावसार यांनी केला.
बॅनरवरील मजकूर असा: पक्षाच्या पडत्या काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर ही वेळ यायला नको. अजून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती झालेल्या नाहीत. फक्त निष्ठेवर निवडणुका जिंकता येत नाहीत, आधी आर्थिक सक्षम हो, मग तुझा विचार करू.! असा मजकूर असलेले बॅनरने सभेसाठी येणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
शहराध्यक्षाची नाराजी काय? : यावेळी माध्यमांशी बोलताना भावसार म्हणाले की, शहराध्यक्ष म्हणून मी अजित पवार यांचे स्वागत करतो. परंतु पक्षाच्या पडत्या काळात काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा आणि अल्पसंख्याकांचा पक्ष राहिलेला नाही, याची खंत वाटते. आज राष्ट्रवादीच्या मेळाव्यात स्टेजवर जे बसणार आहेत, ते सर्वजण २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत होते. २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत देशमुख यांनी पाच हजार मते राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला मिळवून दिली होती. मात्र २०१९ मध्ये मी पक्षाचा शहराध्यक्ष या नात्याने पक्षातील उमेदवाराला १२ हजार मते दोंडाईचा-शिंदखेडा तालुक्यातून मिळवून दिली होती.