राष्ट्रवादी कॉंग्रेसचे झेंडे कार्यक्रमात न लावल्याने अजित पवार यांची प्रतिक्रिया धुळे: 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाचे धुळ्यात अतिशय सुंदर नियोजन झाले आहे. परंतु आता हे दोन पक्षांचे सरकार नसून आम्हीही आता सामील झालो आहोत. त्यामुळे शिवसेना आणि भाजप पाठोपाठ आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही झेंडे लावले पाहिजे होते, असा टोला अजित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला.
मुख्यमंत्र्यांनी काढली समजूत :अजित पवारांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, कार्यक्रमाच्या नियोजनाच्या घाईगर्दीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे लावणे चुकून राहून गेले असेल. परंतु यापुढे काळजी घेतली जाईल असे स्पष्ट केले. जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनविणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेच्या कामासह धुळे शहराच्या विकास कामांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे काम जलदगतीने सुरू असून हा रेल्वे मार्गही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
या मान्यवरांची उपस्थिती :धुळ्यातील एसआरपीएफ मैदानावर 'शासन आपल्या दारी' अभियानातंर्गत धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, मंत्री अनिल पाटील, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार, आमदार किशोर दराडे, जयकुमार रावल, मंजुळा गावीत, काशीराम पावरा, चिमणराव पाटील, मंगेश चव्हाण, महापौर प्रतिभा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
अभियानाचा 3 लाख लोकांना लाभ :'शासन आपल्या दारी' अभियानात धुळे जिल्ह्यात 3 लाख 21 हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शासन आपल्या दारी या लोकाभिमुख कार्यक्रमास राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली नागरिकांना मिळत आहे. सरकारी कार्यालयांच्या चकरा सर्वसामान्यांना माराव्या लागू नये यासाठी शासनाला काम करावयाचे आहे. आदिवासी समाज संघटनेच्या मागण्यांवर बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल. गेल्या वर्षभरात शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. धुळे-नरडाणा-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामासाठी केंद्र सरकार पन्नास टक्के व राज्याचा पन्नास टक्के निधी देणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
पाण्याचा जपून वापर करा:धुळे जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कटिबद्ध आहेत. सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नये यासाठी शासनच जनतेपर्यंत जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशाचा झपाट्याने विकास होत आहे. तापी मधील बॅरेजच्या पाण्याचा वापर वाढला पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आर्थिक शिस्त ठेवत शासन सर्वसामान्यांसाठी सर्वांगिण काम करत आहे. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी खर्च करण्याचे शासनाचे धोरण आहे. पाऊस नसल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे असे नमूद करून धरण पाणीसाठ्याचे योग्य नियोजन प्रशासनाने करावे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
काय म्हणाले गिरीश महाजन?पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, धुळे जिल्ह्यात काही भाग आदिवासी बहुल आहे. त्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना आता कुठे जाण्याची गरज नाही. तुमच्या कामासाठी शासनच आता तुमच्या दारी आले आहे. प्रत्येकाला घर, प्रत्येक घरी शौचालय, वीज, पिण्याचे पाणी, गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते, प्रत्येकाला अन्नसुरक्षा मिळाली पाहिजे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेत 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात आले आहेत. एक रुपयात पीक विमा योजना, महिलांना एसटी तिकिटात 50 टक्के सवलत, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास अशा सर्वसामान्यांच्या कल्याणकारी योजना शासन राबवत आहे.
हेही वाचा:
- Modi And Pawar On Same Platform : नरेंद्र मोदी, शरद पवार 'या' कारणामुळे एकाच मंचावर येणार; कॉंग्रेसचा विरोध?
- Modi Cabinet Expansion : मोदी मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार, अनेक बड्या नेत्यांना मिळू शकतो डच्चू!
- Rohit Pawar : 'अजित पवार मुख्यमंत्री झाले तर स्वागत करणार नाही', रोहित पवारांची जोरदार बॅटींग