धुळे- जिल्ह्यात रविवारी (दि. 21 जून) तब्बल 51 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री उशिरा आणखी 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकाच दिवशी 65 रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोना बाधितांची एकूण संख्या 562 झाली आहे. तर रविवारी दिवसभरात 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित 189 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रविवारी कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला असून यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
धुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून रविवारी सायंकाळी 51 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. यानंतर रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार धुळे जिल्हा रुग्णालयातील 72 अहवालांपैकी 4 जणांचे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 31 पैकी 9 जणांचे तर, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील 2 पैकी 1 जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तब्बल 14 जणांची भर पडली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 562 झाली आहे. रविवारी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत धुळे जिल्ह्यात 325 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 189 जणांवर उपचार सुरू आहेत.